Loading...
मंगळवार, 1 जून 2021, 09:37 pm( 4 वर्षे ago)
मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये प्रशासनाला मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा केवळ 835 असल्याचं पाहायला मिळालं. तर दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा हा 5868 एवढा आहे. मुंबईत मृत्यूच्या आकड्यातही घट झाल्यानं तीही समाधानाची बाब ठरली आहे. दिवसभरात मृत्यू झालेल्यांचा आकडा 23 आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेटचा विचार करता हे प्रमाण तब्बल 95 टक्क्यावर पोहोचलं आहे. दुसरीकडं राज्यात आणि देशात चिंतेचं कारण बनलेलं पुणदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धक्क्यातून सावरत आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 384 रुग्ण आढळल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा इथंही कमी झाला आहे. तर पुणे शहरातील मृतांचा आकडा 39 आहे. त्यापैकी 28 पुण्यातील आणि 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. मंगळवारी 858 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर सध्या 5518 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिलासा मिळाल्यानं सरकारनं राज्यातील काही जिल्ह्यांना दिलासा देत मंगळवारपासून निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र आता पुन्हा कोरोनाची संख्या वाढणं कुणालाही परवडणारं नाही, त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दिलेल्या नियमांच पालन करणं त्यासाठी अत्यंत गरजेचं ठरणार आहे.